Popular Essays

विष्णू वाघांच्या जाण्याचे काही संदर्भ

‘विष्णू मामा गेला’ हे फोनवर टाईप करताना क्षणातच अनंत युगांचं पोरकेपण नशिबी आल्याची जाणीव झाली. ह्या वाक्यात महत्वाचं आहे ते ‘गेला’ हे क्रियापद. त्याच्यामाझ्या सहवासातले ठळक टप्पे आठवण्याचा प्रयत्न केल्यास तो सतत कुठेतरी ‘गेलेलाच’ असल्याची जाणीव झाली. १९९४ मध्ये तो मगो सोडून काँग्रेसमध्ये गेला. तेव्हा मी तीन वर्षांचा होतो. ते त्याचं चुकलेलं पहिलं पाऊल असं मी लहानाचा मोठा होईपर्यंत ऐकत आलो आहे. तो ज्या दिवशी काँग्रेसमध्ये गेला त्या संध्याकाळी आमच्या घरी एक वादळी बैठक झाली. त्यात विष्णू मामाबरोबर वावरणारे, अगदी आदल्या रात्री व त्या दुपारपर्यंत त्याच्याबरोबर असणारे त्याचे सहकारी उपस्थित होते. तो काँग्रेसमध्ये गेलाच कसा ह्या प्रश्नावर माझे आजोबा विश्वनाथ नाईक ह्यांनी सगळ्यांनाच फैलावर घेतले. त्यातल्या बऱ्याच जणांना तो काँग्रेसमध्ये जाणार असल्याचा काहीच सुगावा नव्हता.

त्यानंतर तो तपोभूमीत गेला, मुंबईत गेला, भाजपमध्ये गेला, आणि आता सरतेशेवटी दक्षिण आफ्रिकेला गेला. थोड्याफार फरकाने ह्या जागांवर तो स्वेच्छेने गेला का कोणीतरी त्याला नेला हे कोडंच राहिलं. त्याच्या काँग्रेसमध्ये जाण्याने घरातले संबंधही ताणले गेले. त्यानंतर अजून एक तडकाफडकीचा निर्णय घेऊन सगळं मागे टाकून तो मुंबईला गेला आणि विस्मृतीत जावा एवढा अलिप्त झाला. हा काळ आमच्यासाठी जरा त्रासदायकच होता. कालांतराने तो परत आलाही पण ताणले गेलेले संबध परत रुळावर येतील अशी शक्यता दिसत नव्हती.

सुमारे २०१२-१३ची गोष्ट असेल. तेव्हा मी पुण्यात राहत होतो. तो कुठल्याशा समारंभात पुण्यात येणार असल्याची बातमी मी वर्तमानपत्रात वाचली व फोन करून त्याला भेटायला गेलो. तो बालगंधर्व नाट्यमंदिराच्या मागे ‘स्वान इन’ नावाच्या एका हॉटेलात उतरला होता. मी तिथे पोचेपर्यंत डॉ मोहन आगाशे, रामदास फुटाणे, वि भा देशपांडे आणि मामा असा अड्डा जमला होता. राजकारण, साहित्य, नाटक अश्या बऱ्याच विषयांवर चर्चा रंगली होती. ‘हे आमचे भाचेश्री’ अशी माझी ओळख करून दिली. तब्बल बारा वर्षानंतर आम्ही दोघे अनौपचारिकपणे एकाच खोलीत बसून गप्पा करत होतो. त्याच्या मध्यन्तरीच्या आयुष्याचा आलेख मला काहीसा तिथे उलगडला. त्याचं क्षणिक कौतुकही वाटलं. मी जायला निघालो तेव्हा त्याला दारापाशी बोलवून खूप रडलो. जास्त काही बोलायची गरज पडली नाही. त्यानेही मला करकचून मिठी मारली व हुंदका दिला. एक तप ताणलेलं नातं काहीसं सैल झालं. पण तो आपल्या व्यक्तिगत आयुष्यात व कारकिर्दीत खूप पुढे ‘गेला’ असल्याची जाणीवही त्या रात्री झाली. एकदम परतीचे दोर कापून वगैरे म्हणावा तसा.

त्यानंतर तो आमदार झाला. मी पुढील शिक्षणासाठी दिल्लीत आलो. त्याचं दिल्लीत येणं झालं कि तो हमखास फोन करायचा. एप्रिल २०१६ मध्ये तो दिल्लीत आला असता जर्मनीमध्ये एका सेमिनारसाठी माझी निवड झाली असल्याचं मी त्याला सांगितलं. त्या निमित्ताने दिल्लीतल्या त्याच्या मित्रांना गोवा भवनात बोलवून त्याने एक पार्टी दिली. ‘ये मेरा भांजा है, मेरी तरह रायटर है और फायटर भी’ अशी माझी ओळख त्यांना करून दिली. ओरिसामध्ये निघणाऱ्या ‘समाज’ ह्या वर्तमानपत्राचे दिल्ली ब्यूरो चीफ किशोर व्दिबेदी हे त्याचे खास मित्र. त्यांच्यापाशी नेऊन ‘ये हमारा बेटा यहां अकेले रहता है तो कभी घर पे बुलाके इसे फिश खिलाना’ असंही त्यांना हक्काने सांगितलं. दुसऱ्या दिवशी मी त्याला एअरपोर्टवर सोडायला जात असता गाडीत हळूच माझ्या हातावर काही पैसे ठेवले. मी काही बोलण्याच्या आत हात घट्ट धरत म्हणाला “जेव्हा हे सगळं तुला द्यायची इच्छा होती तेव्हा इतक्या पैशांनाही मी मोताद होतो व जेव्हा देऊ शकत होतो तेव्हा मीच तुमच्यापाशी नव्हतो. आता हे जुळून आलंच आहे तर ठेव”. असं काहीतरी जुजबी बोलला. घडत्या वयात आम्हा भावंडांच्या आसपास तो नव्हता ह्याची सल त्यालाही होती हे तो नकळत सूचित करून ‘गेला’.

From L to R (Kaustubh Naik, Purav Goswami, Vishnu Wagh, and Ankur Saxena) Photo Credits: Amar Sawant

त्यानंतर अजून एकदा तो दिल्लीत आला होता तेव्हा अमृता शेरगील मार्गवरील गोवा सदनात उतरला होता. हि आमची शेवटची भेट. तेव्हा दिल्लीस्थित पत्रकार ओंकारेश्वर पांडे आणि ललित कला अकादमीचे विद्यमान सचिव व गोव्याचे सुपुत्र राजन फुलारी उपस्थित होते. गप्पांच्या ओघात त्याने आपण २०१९ च्या लोकसभेची तयार करत असून मी प्रचाराला येणे अपेक्षित आहे असे सांगितले. मी म्हटलं तू भाजपच्या तिकिटावर लढवत असशील तर नक्कीच येणार नाही. ह्यावर त्याने नेहमीच्या फटकळपणाने कोणीही तिकीट दिलं तरी मी निवडून येईन हेही ऐकवलं. त्याच्यापाशी कमालीची महत्वाकांक्षा होती. इतर लोकांनी सतत ‘त्याची महत्वाकांक्षाच त्याला दरवेळी नडते’ अशी तक्रार करायची संधी सोडली नाही. पण मला हे कधीच पटलं नाही. महत्वाकांक्षा असणं हा काही गुन्हा नाही. विशेषतः ज्या परिस्थितीतून वर येऊन त्याने स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं ते असामान्य महत्वाकांक्षेशिवाय शक्यच नव्हतं. पण तो ज्या बहुजन समाजातून वर आला त्या समाजातल्या लोकांनी राजकीय सोडाच, ताठ मानेने जगण्याचीही महत्वाकांक्षा बाळगणं हा जातीव्यवस्थेने ठरवून दिलेला गुन्हा आहे. त्या व्यवस्थेच्या नाकावर टिच्चून त्याने स्वतःच्या गुणांवर आपलं अढळपद गोव्यातल्या सांस्कृतिक व राजकीय पटलावर कायम केलं. बहुजन समाजातल्या इतर नेत्यांमध्ये आणि विष्णूमामामध्ये हा एक मोठा फरक होता.

पण ह्याचीच दुसरी बाजू म्हणजे ज्या बहुजन समाजाचं नेतृत्व त्याने करणं अपेक्षित होतं त्या बहुजनसमाजातील नेत्यांनी व लोकांनीही त्याला कितीसा पाठिंबा दिला व त्याच्या राजकीय महत्वाकांक्षेमागे ते किती खंबीरपणे उभे राहिले हेही पडताळले पाहिजे. स्वतंत्र गोमंतकाच्या इतिहासात त्यांच्याइतकी प्रतिभासंपन्न व्यक्ती झाली नाही. ‘असा विद्वान पुन्हा होणे नाही’ वगैरे उदगार काढणे सोपे पण तो हयात असताना त्याच्या विद्वत्तेला आपण काय न्याय मिळवून दिला ह्याचाही विचार बहुजन समाजाच्या पुनरुत्थानाची चिंता करणाऱ्यांनी केला पाहिजे. मगोने तिकीट नाकारण्यापासून भाजपने मंत्रिपद नाकारण्यापर्यंतच्या त्याच्या राजकीय कारकीर्दीतल्या असंख्य शक्यता इतर राजकीय शक्तींसोबत स्वतः बहुजन समाजाच्या नेतृत्वानेच पुसून टाकल्या हे त्याचं मोठं शल्य होतं. ह्या शल्यामुळे सतत स्वतःला सिद्ध करत राहणं व रेलेवंट ठेवणं ह्यातच तो गुरफटून ‘गेला’.

हे त्याचं शल्य प्रामाणिकपणे उमटलं ते त्याच्या कवितांमधून. त्याच्या कविता अभ्यासपूर्ण वाचल्या तर राजकीय व वैयक्तिक शल्याने भळभळून लिहिलेल्या कविता त्याच्या इतर कवितांपेक्षा फारच उजव्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. उदारहरणार्थ खालील ओळी पहा

 

घोंगवत येणाऱ्या चक्रीवादळापासून

गावाची राखण करायला

बेंबीच्या देठापासून देवचारानं घालावा साद

पण झोपलेला जमाव बहिराच होऊन जावा

नि येऊ नये कोणाला जाग

 

‘अन्यायसूक्त’ हि त्याची ‘सुशेगाद’ ह्या संग्रहातली कविता. हीच कविता ‘सुदीरसुक्त’मध्ये कोकणीतून लिहिली आहे. त्याचं साहित्यिक मूल्य बाजूला ठेवून त्यातल्या सामाजिक समस्येला आपण पडताळून पाहिलं तर ह्यातली वेदना आपल्या लक्षात येईल. ह्यातला हतबल देवाचांर तो स्वतः आहे. आपण गोदो आहोत आणि जिथे आपली गरज आहे, जिथे आपली वाट बघितली जाती तिथे आपण पोहोचू शकत नाही हि ती वेदना. त्याची व्यक्तिगत व राजकीय कारकीर्द ज्यांनी जवळून पहिली आहे त्यांना ह्याचे संदर्भ अचूक लागतील.

दिल्लीतच एकदा त्याची ओळख ‘कहने को तो ये नेता है लेकिन सच्चे कवी है’ अशी करून दिल्यावर तो टरकलाच. ‘मैं इन दोनो में सच्चे झूठ का फ़रक नही करता और दोनोंपर मेरा उतनाही कमांड है’ असं जरा रागावूनच बोलला. सतत त्याला कवी, नाटककार वगैरे म्हणून त्याचं राजकीय कर्तृत्व बोथट केलेलं त्याला अजिबात खपत नसे.त्याच्या कवितांमधे तीव्र राजकीय संदर्भ होते आणि एका कवीला साजेश्या बेफिकिरीनेच त्याने राजकारण केलं.

त्या अनुषंगाने पाहिलं तर ‘सुदीरसुक्त’ हा त्याचा कवितासंग्रह एक राजकीय मॅनिफेस्टोच आहे. ह्याचं मुख्य कारण म्हणजे त्यातल्या कवितांची तात्विक बैठक हि केवळ गोव्यातल्या बहुजनवादावरच नाही तर प्रख्यात फ्रेंच तत्त्ववेत्ते व भाषावैज्ञानिक देल्यूज व ग्वातारी, वर्णभेद व वसाहतवादावर अचूक भाष्य करणारे फ्रान्झ फॅनॉन, भारताचे भाग्यविधाते डॉ बाबासाहेब आंबेडकर, इटालियन मार्क्सवादी विचारवंत आंतोनियो ग्रामशी इत्यादी विचारवंतांच्या मांडणीशी वारसा सांगणारं आहे. मराठी काव्यपरंपरेत दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर ह्यांनी जो लिटररी मॉडर्निझम (साहित्यिक आधुनिकतावाद) वाचकांसमोर आणला त्या दर्जाची आधुनिकता सुदीरसुक्तमधून कोंकणीत आणण्याचे श्रेय विष्णूमामाला द्यायला हवे. सतत वांझोटी प्रादेशिकता व स्मृतिरंजन प्रसवणाऱ्या कोकणी साहित्यविश्वाला सुदीरसुक्तचा मॉडर्निझम परवडणारा नाही. कारण त्यातली कविता हि कोंकणीच्या भाषिक राजकारणाच्या बुनियादींनाच सुरुंग लावणारी आहे.

त्याच्या मृत्यूवर जे वादंग उठले तीही एक मोठी शोकांतिकाच. त्याच्या सावलीतही राहायची ज्यांची लायकी नव्हती अश्या लोकांनी शेवटपर्यंत त्याला घुसमटत ठेवलं. त्यामुळे त्याचे असे जाणे मनाला हुरहूर कमी आणि मनस्ताप अधिक देऊन गेले. मध्यंतरी माझ्या आईला त्याची विचारपूस करताना ‘बाबा असताना आम्हाला कसलीच भीती वाटत नव्हती’ असं कोणीतरी म्हणाले. कवी, नाटककार, पत्रकार हि एका क्षणानंतर केवळ बिरुदं ठरावीत पण आपल्या जगण्याने इथल्या सामान्य जनतेला आयुष्य रेटण्याची आश्वस्तता तो देऊ शकला हे त्याचं खरं संचित. ते रिक्लेम केलं पाहिजे. जेणेकरून कुठल्याही परिसमाप्तीशिवाय त्याच्या जाण्याने एक जी अस्वस्थता भरून राहिली आहे ती दूर होऊन एक निर्मळ, प्रामाणिक वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी उपलब्ध होईल.

हा लेख पहिल्यांदा दैनिक लोकमतच्या मंथन ह्या पुरवणीत २४ फेब्रुवारी २०१९ रोजी छापून आला.

2 thoughts on “विष्णू वाघांच्या जाण्याचे काही संदर्भ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.