कौस्तुभ नाईक/KAUSTUBH NAIK
गोमंतकीय वंशाचे व पोर्तुगालचे सद्याचे पंतप्रधान आंतोनियो कॉश्ता हे गोवा भेटीवर असतानाचे निमित्त साधून साडेचारशे वर्षाच्या पोर्तुगीज राजवटीसाठी कॉश्ता ह्यांनी माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते सुदिन ढवळीकर ह्यांनी केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर आलेली ही मागणी आणि ढवळीकरांचे सनातनी हिंदुत्वप्रेम लक्षात घेतल्यास ह्या मागणीचा रोख नेमका कुठे आहे हे सुज्ञास सांगायची गरज नाही. पण अशा घोषणामागे गोव्याच्या वसाहतवादी इतिहासाचे एकसुरी चित्र रंगवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न अधोरेखित केले पाहिजे.
पोर्तुगीजांनी गोव्यावर साडेचारशे वर्षे राज्य केले खरे पण आपण एक लक्षात घेतले पाहिजे कि साडेचारशे वर्षे हा खूप मोठा कालखंड आहे. ह्या कालखंडात पोर्तुगीज राजवटीत तसेच जागतिक वसाहतवादाच्या इतिहासात अनेक स्थित्यंतरे घडली. मुळात सद्याचा गोवा प्रदेश पोर्तुगीजांनी जुन्या व नव्या काबिजादी अश्या दोन टप्प्यात काबीज केला. ह्या दोन्ही काबिजादी पोर्तुगीजांच्या अंमलाखाली येण्यामध्येच सुमारे दोनशे वर्षांचे अंतर आहे. नव्या काबिजादी पोर्तुगीजांच्या राजवटीखाली येता येता पोर्तुगीज सत्ताकारणाचे धार्मिक पैलू बदलले होते त्यामुळे साडेचारशे वर्षे सतत इथल्या लोकांचा धार्मिक छळ वगैरे झाला हे एक मोठे थोतांड आहे. जुन्या काबिजादीत देखील जी धर्मांतरे झाली ती सगळीच काही तथाकथित जुलुमांतर्गत झाली नसून त्याकाळाच्या जातीय समीकरणांचा ही धर्मांतरे घडवून आणण्यात खूप मोठा हात होता ह्याचे अनेक तपशील विविध इतिहासकारांनी नोंदवलेले आहे. गोमंतकीय इतिहासाची मींमासा करताना आपण हेही लक्षात ठेवले पाहिजे कि गोमंतकीय समाज हा काही एकजिनसी स्वरूपाचा नसून जात, धर्म व वर्गवार वैविध्य व विषमता असलेला हा समाज आहे. गोमंतकीय समाजाच्या विविध घटकांचा पोर्तुगीज सत्तेशी विविध पातळीवर संबंध होता. इथल्या स्थानिक ब्राह्मणांचे वर्चस्व हे बहुतांशी त्यांच्या पोर्तुगीज राजवटीकडे असलेल्या जवळीकेमुळे आहे. गोमंतक मराठा समाजाला स्थानिक ब्राह्मणांच्या जोखडातून मुक्त करण्यात पोर्तुगीज राजवटीचा मोठा हात आहे हे राजाराम पैगीणकरांनी आपल्या आत्मचरित्रात नमूद केले आहे.त्यामुळे संपुर्ण गोमंतकीय जनतेचे पोर्तुगीजांकडे एकसुरी व शत्रुत्वाचे संबंध होते असे मानणेही इतिहासाला धरून नाही. नव्या काबिजादीत पोर्तुगीजांमार्फत सत्ता चालवणारे हे बहुतांशी हिंदू ब्राह्मण होते. विविध सरकारी आस्थापनात तसेच सत्तेच्या इतर व्यवहारात त्यांची वर्णी लागली होती. इथल्या बहुजन समाजाचे शोषण पोर्तुगीजांपेक्षा इथल्या ब्राह्मणांनी जास्त जवळून व जोमाने केले आहे. गोव्यात असलेली जमिनीची कोमुनिदाद व्यवस्था व देवळातील अधिकार व मालकीचे हक्क आखून देणारा महाजनी कायदा व ह्या दोहोत असलेले स्थानिक हिंदू ब्राह्मणांचे वर्चस्व हि खुद्द पोर्तुगीज सरकारने इथल्या ब्राह्मणांना दिलेली ‘सप्रेम भेट’ आहे.
हल्लीच मडकई येथील नवदुर्गा मंदिराच्या प्रकरणामुळे पोर्तुगीजकालीन महाजनी कायद्याच्या अंतर्गत असलेल्या अलोकशाही तरतुदींवर नव्याने चर्चा झाली. ढवळीकर हे खुद्द मडकई मतदारसंघाचे नेतृत्व करतात पण ह्या वादात त्यांनी कसलीच ठोस भूमिका घेतली नाही. पोर्तुगीजांनी केलेल्या अत्याचाराची जर एवढीच चीड त्यांना होती तर सेवेकरी ग्रामस्थांच्या हक्कासाठी त्यांनी निश्चितच आवाज उठवायला हवा होता आणि हा कायदा रद्द करावा अशी मागणी विधानसभेत करायाला पाहिजे होती. तसे काही झाल्याचे ऐकिवात नाही. मगो पक्ष हा एकेकाळी बहुजनावादाचा किल्ला गोव्यात लढवत होता. किंबहुना त्या बुनियादी तत्वांची जाण ठेवून पक्ष पातळीवर देखील मगो पक्षाने महाजनी कायद्याला विरोध दर्शविला नाही. इतिहासात मागे जाऊन माफीच मागायची झाली तर एक मोठी यादीच तयार करावी लागेल. पोर्तुगीजकालीन महाजनी कायदा बरखास्त करण्यासाठी विशेष प्रयत्न न केल्यामुळे मगो पक्षानेदेखील गोमंतकीय बहुजन समाजाची माफी मागण्यास काही हरकत नसावी.