ख्रिस्तपुराण आणि सतराव्या शतकातील भक्तिभावाचा इतिहास

By KAUSTUBH SOMNATH NAIK/कौस्तुभ सोमनाथ नाईक

इतिहासलेखन राजे राजवाडे, युध्द, सन सनावळ्या ह्यांची नोंद करणे ह्यापुरतेच मर्यादित नसून भूतकाळाचा विविधांगी धांडोळा घेण्याचा उत्तरोत्तर प्रयत्न जगभरातील इतिहासकार करत असतात. ह्यातूनच इतिहासाच्या विविध उपशाखा निर्माण होत असतात ज्ञान/संकल्पनांचा इतिहास (इंटलेक्च्युल हिस्ट्री), विज्ञानाचा इतिहास (हिस्ट्री ऑफ सायन्स) अश्या काही इतिहासाच्या विशेष उपशाखा गेल्या काही दशकांत तयार झाल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे हिस्ट्री ऑफ इमोशन्स – भावनांचा इतिहास. मुळात मूलभूत मानवी भावना ह्या वैश्र्विक असतात का नाही आणि असल्या तरी विविध संस्कृतीत त्यांचे काय आयाम असतात, त्या भावना व्यक्त करण्याचे मार्ग कोणते, ऐतिहासिक काळात समाज कश्या तऱ्हेनं भावनिक पातळीवर व्यक्त होत होता ह्याचा आढावा ह्या उपशाखेत घेतला जातो. आजच्या सदरासाठी डॉ अनन्या चक्रवर्ती ह्यांनी हिस्ट्री ऑफ इमोशन्स ह्या उपशाखेतील संकल्पना वापरून लिहिलेल्या ‘बिटवीन भक्ती अँड पिएटा (२०१७)’ ह्या निबंधाविषयी आपण जाणून घेणार आहोत. डॉ अनन्य चक्रवर्ती ह्यांनी शिकागो विद्यापीठातून इतिहासात पीएचडी मिळवली असून त्या सद्या वॉशिंग्टन डीसी येथील जॉर्जटाऊन विद्यापीठात दक्षिण आशियाई इतिहास शिकवतात. त्यांचे गोवा आणि ब्राझील ह्या प्रदेशातील पोर्तुगीज साम्राज्यवादाच्या इतिहासावरचे ‘एम्पायर ऑफ अपोस्टल्स’ हे पुस्तक काही वर्षांपूर्वी प्रकाशित झाले आहे.

अभिलेख आणि दफ्तारांतील साधनांमध्ये मर्यादित राहिलेल्या इतिहासलेखनाला छेद देत फ्रेंच इतिहासकार ल्युसियन फेब्रने भावनांचा इतिहास लिहायची संकल्पना आणि त्याचे शास्त्र एका निबंधात मांडले. त्यानंतर बरेचसे स्थित्यंतर विसाव्या शतकातील इतिहासलेखनात झालेले आहे. डॉ चक्रवर्तींचा सदर निबंध हा त्याच परंपरेतला आहे. मुख्यतः धर्माचे अध्ययन करणाऱ्या संशोधकांनी हिस्ट्री ऑफ इमोशन्स ह्या उपशाखेकडे हवे तसे लक्ष अजून दिले नाही असेही त्या म्हणतात. ख्रिस्तपुराणाचे विवेचन करून धर्म/धार्मिक जाणीव आणि भावनांमध्ये असलेले नाते त्या समजण्याचा प्रयत्न ह्या निबंधातून करतात.

सर्वप्रथम ख्रिस्तपुराणसारखे काव्य ज्या काळात निर्माण झाले त्याविषयीची सामाजिक परिस्थतीती त्या उद्घृत करतात. पोर्तुगीज राजवटीच्या सुरुवातीपासूनच सासष्टीमध्ये बरीच राजकीय उलथापालथ चालली होती. हा भाग पोर्तुगीजांच्या ताब्यात आल्यानंतर तिथे मोठ्या प्रमाणात धर्मांतरण झाले. नदीपलीकडे बिजापुरी सत्ता असल्याने त्यांच्यात आणि पोर्तुगीजांमध्ये वारंवार छोट्या लढाया होत असत. धर्मांतर आणि ह्या वेळोवेळी होणाऱ्या लढायांमध्ये हिंदू देवस्थळांची बरीच हानी होत असल्याने तेथील नागरिकांनी नदी ओलांडून बिजापुरी सुलतानाचा आसरा घेत. तसेच काहीं हिंदूंनी पोर्तुगीजांविरुद्ध लढण्यात बिजापूर सुलतानाची मदतदेखील केली.धर्मांतरणासाठी सासष्टी हा सोपा प्रदेश नव्हता असे थॉमस स्टीफन्स ह्यांनी आपल्या भावाला लिहिलेल्या एका पत्रात नमूद केलंय.

कदाचित ह्या सगळ्या पेचातून मार्ग काढण्यासाठी स्टीफान्स ह्यांनी ‘अकोमोडाशियो’ ह्या प्रक्रियेचा वापर केला. अकोमोडाशियो हि जेजुइट पद्धत आहे ज्यात ख्रिस्ती होण्यासाठी लागणारे आवश्यक ज्ञान आणि प्रथा ह्या स्थानिक प्रथांशी एकनिष्ठ राहून केल्या जातात. मुळात त्यांनी स्टिफन्स ह्यांच्या आधीही काही व्यक्तींनी हे काम केले आहे. मुळात ख्रिस्ती धर्माचे ज्ञान आणि प्रथा नवीनच बाटलेल्या ब्राह्मणांना स्थानिक भाषेत उपलब्ध करून देणे तसे कठीण काम नव्हते. सगळ्यात महत्वाचे म्हणजे देवाचा शब्द त्या भाषेत अनुवादित व्हावा अशी त्या भाषेची लायकी आहे का असा प्रश्न जेजुइट पाद्र्यांना पडला होता. ते ठरवण्याचे प्रमाण म्हणजे त्या भाषेचे व्याकरण लॅटिनच्या ढाच्यावर बसते का नाही हे पाहणे. तामिळ, मराठी, कोंकणी ह्यांची काही व्याकरणे लॅटिन भाषेच्या धर्तीवर जेजुइट पाद्र्यांनी तयार करविली.

एक अवांतर मुद्दा नमूद करू इच्छितो कि ढोबळमानाने धर्मातरणाचा इतिहास हा हिंसा आणि अत्याचारानेच व्यापलेला आहे असे काहीसे चित्र प्रचलित इतिहासात आपल्याला पाहायला मिळते. पण हे एक मर्यादित चित्र आहे. गोव्यात ख्रिस्ती धर्माची स्थापना हि एकतर्फी नव्हती आणि नवीन धर्मांतर केलेल्या ख्रिस्ती अनुयायांमध्ये, खासकरून ब्राह्मण अनुयायांमध्ये, ह्या नवीन धर्माविषयी कमालीची आस्था आणि उत्सुकता होती. हल्लीच डॉ अदिती शिरोडकर ह्यांनी शिकागो विद्यापीठात सादर केलेल्या आपल्या प्रबंधात गोव्यातील सुरुवातीच्या काळात ख्रिस्ती धर्माचा प्रसार व स्थानिकांनी दिलेला प्रतिसाद ह्याविषयी सविस्तर लिहिले आहे. तो प्रबंध अजून प्रकाशित झाला नसल्याने त्यातील मुद्दे इथे उपस्थित करणे उचित नाही पण एवढे लक्षात येते कि सत्ता आणि वर्चस्वाच्या खेळात धर्माचे प्रमुख स्थान होते. धर्मांतरणाचे विविधांगी पैलू ह्या संशोधनातून आपल्याला आढळून येतात. ख्रिस्तपुराणाची निर्मिती हेदेखील त्याचेच द्योतक आहे. मुळात नवीन धर्मांतरण केलेल्या अनुयायांना त्यांच्या भाषेत नवीन धर्माविषयी माहिती हवी होती जेणेकरून त्यांच्या सरावाच्या पद्धतीने ते त्या धर्माचे आचरण करू शकतील. ह्याच मागणीमुळे ख्रिस्तपुराणाची निर्मिती झाली. ख्रिस्तपुराणाचे स्वरूप हे प्रश्नोत्तरी आहे जिथे नवीनच धर्मांतरित झालेले ब्राम्हण अनुयायी विविध प्रश्न विचारतात आणि त्या प्रश्नांचे केलेले निरसन म्हणजेच ख्रिस्तपुराणातील ओवीसदृश काव्य होय.

१६१४ साली ख्रिस्तपुराण लिहून तयार झाले आणि १६१७ साली प्रकाशित झाले. इन्क्विजीशनतर्फे त्याची छाननी करण्यात आली आणि त्यासाठी फादर स्टिफन्स ह्यांनी मराठीबरोबरच ख्रिस्तपुराणाची पोर्तुगीज भाषेत एक प्रत बनवून पाठवली. तिथल्या अधिकाऱ्यांनी दोघींचा अभ्यास करून मराठीच्या मर्यादेत जेवढे शक्य आहे तेवढ्यात देवाचा संदेश अंकित केल्याचे निरीक्षण पेद्रु मास्कारेन्ह्यश ह्या जेजुइट पाद्र्याने केल्याचे नमूद आहे. ह्यावरूनच सतराव्या शतकात अलंकारिक मराठीचे ज्ञान गोव्यातील स्थानिक तसेच पोर्तुगीज अधिकाऱ्यांना होते असे चक्रवर्ती सूचित करतात.

ख्रिस्तपुराण पाच भागांत विभागले आहे – आदिपुराण (जुना करार), सर्ग, प्रतीसर्ग, वंश, मन्वतराणी, आणि वंशनुचरिता. ख्रिस्तपुराणात नवीनच धर्मांतरण झालेल्या ब्राम्हण ख्रिस्ती लोकांना बायबल समजून त्याचे आकलन सोप्या पद्धतीने व्हावे ह्यासाठी स्टिफन्स वैष्णव पंथातील प्रतीकांचा वापर करून बायबलमधले विश्व सोप्या मराठी भाषेत आणि ओवी छंदात अनुसर्जित करतात. उदाहरणार्थ स्टिफन्स हेवन ह्या संकल्पनेला वैकुंठ असे अनुवादित करतात. ह्यातील लिखाणावर मराठी भक्ती साहित्याचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. बायबल तसेच भक्तीसाहित्यातील साम्यस्थळांचा नेमका वापर स्टिफन्स ह्या काव्यात करताना दिसतात. ख्रिस्तपुराणातील भावनांच्या मांडणीबद्दल बोलताना डॉ. चक्रवर्ती ह्या मातृत्वभावाविषयी बोलतात. देव हा लीला दर्शवणारा छोटा बालक आहे अशी प्रतिमा कॅथॉलिक साहित्य तसेच भक्ती साहित्य ह्या दोन्ही परंपरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही परंपरांमध्ये कधी भक्त देवाकडे मातृत्वभावाने पाहतो तर कधी भक्त स्वतःला बाळ समजून देवाला मातृत्वरूपात पाहतो. ह्या दोन्ही परंपरांमध्ये असलेले मातृत्वभावाचे अनन्यसाधारण महत्व हेच ख्रिस्तपुराणसारख्या काव्याची निर्मिती प्रक्रिया सोपी करतात असे मत डॉ चक्रवर्ती मांडतात.

(First published in Gomantak, dt: 19 February, 2022)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.