पुरुषी नजर व स्त्री पुरुष समानता

कौस्तुभ नाईक/KAUSTUBH NAIK

 

डॉ लॉरा मल्वे ह्या ब्रिटिश प्राध्यापिकेने १९७५ साली ‘व्हिजुअल प्लेजर अँड नॅरेटिव्ह सिनेमा’ नावाचा एक निबंध ‘स्क्रीन’ ह्या नियतकालिकात प्रकाशित केला. ह्या निबंधात डॉ मल्वे ह्यांनी मनोविश्लेषणाचे सिद्धांत वापरून तत्कालीन हॉलिवूड सिनेमात स्त्रियांना चित्रित करण्याच्या प्रचलित पद्धतीवर भाष्य केले. सिनेमा हे माध्यम पुरुष दिग्दर्शकांनी पुरुष कॅमेरामन वापरून पुरुष प्रेक्षकांसाठी निर्माण केलेले असल्याने पडद्याबाहेर पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची नजर त्यात परावर्तित होत असल्याचे मल्वे ह्यांनी सांगितले. त्यामुळे स्त्रियांना नेत्रसुखासाठी न्याहाळण्याचा सुप्त पुरुषी इच्छा पडद्यावर पूर्ण करण्यासाठी चित्रपटात स्त्रियांचा समावेश केला जातो असा शेरा त्यांनी मारला. ह्या सुप्त विलासी इच्छेला त्यांनी ‘मेल गेझ’ (पुरुषी नजर) असे नाव दिले.

मानसशास्त्रात मनुष्याला इतरांना न्याहाळून त्यातनं सुख प्राप्त करून घेण्याच्या प्रकाराला ‘स्कोपोफिलिया’ म्हणतात. मल्वेंच्या मते सिनेमा बघणे हि एक स्कोपोफिलिक कृती आहे ज्यात बिनधास्तपणे आपण इतर व्यक्तींच्या शरीराकडे, त्याच्या आयुष्याकडे न्याहाळून बघू शकतो व त्यातून सुख प्राप्त करून घेऊ शकतो. सिनेमा हे माध्यम प्रामुख्याने पुरुषप्रधान आणि पुरुषकेंद्रीत असल्याने पुरुषांची स्त्रियांकडे पाहण्याची नजर हि ह्याच स्कोपोफिलिक प्रक्रियेतून निर्माण होते. सिनेमात स्त्रियांना कल्पिणारा दिग्दर्शक, तिचे चित्रीकरण करणारा सिनेमॅटोग्राफर आणि बघणारा प्रेक्षक ह्या तिघांच्या एकत्रित नजरेतून स्त्री पडद्यावर साकारली जाते. त्यालाच मल्वे ‘मेल गेझ’ म्हणतात. हि प्रक्रिया जरी मूलभूत मानसशास्त्रीय गरजेतून प्रबळ होत असली तरी तिचे परिणाम सर्वव्यापी आहेत. मल्वेंच्या मते सिनेमात स्त्री हि प्रामुख्याने पुरुषांच्या नयन आणि शरीरसुखासाठी तसेच पुरुष पात्रांचा अहंकार जोपासण्यासाठी कथानकात समाविष्ट केली जातात. स्त्रियां कथानकाचा अविभाज्य भाग ना बनवता त्यांना स्वतःचा अवकाश, आकांक्षा दिली जात नाही. अगदीच सत्तरच्या दशकातील उदाहरण घ्यायचे झाले तर जेम्स बॉण्ड चित्रपटांचे घेता येईल ज्यात स्त्रियांचे अश्याप्रकारे दुय्यम चित्रण केले गेले आहे. सत्तरच्या दशकाच्या तुलनेने आज अधिकाधिक स्त्रीप्रधान चित्रपट बनत आहेत तरीही परिस्थिती फारशी सुधारल्याचे आपल्याला दिसत नाही.

मल्वेंच्या ह्या निबंधामुळे केवळ स्त्रीवादी चित्रपट समीक्षेला कलाटणी मिळाले असे नाही तर एकूणच समाज म्हणून आपण स्त्रियांना पडद्यावर आणि पडद्याबाहेर कसे बघतो ह्याचे सैद्धांतिक पद्धतीने विश्लेषण करता आले. मल्वेंच्या निबंधातील मुद्दे हे आजही केवळ सिनेमाच नव्हे तर चित्रकला, साहित्य, नाटक आदी पुरुषप्रधान माध्यमांची समीक्षा करण्यासाठी, खास करून ह्या माध्यमातून होणाऱ्या स्त्रियांच्या चित्रणाची चिकित्सा करण्यासाठी, वापरले जातात. ह्या सर्व माध्यमांतून साकार झालेले कलाविष्कारात केवळ स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनावर परिणाम झाला असे नाही तर स्त्रियांवर एकूणच सौंदर्याच्या, घरकामाच्या, व वर्तनाच्या अवास्तव अपेक्षा लादण्यात आल्या. आजही ह्या अपेक्षांचे ओझे स्त्रियांवर लादण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालू आहे.

भारतीय चित्रपटसृष्टीत केवळ बॉलिवूडच नव्हे तर प्रादेशिक सिनेमांमध्येसुद्धा स्त्रियांचे असे दुय्यम चित्रण दिसून येते. आजही अनेक चित्रपटांत नायिका पहिल्यांदा पडद्यावर दाखवताना कॅमेरा तिला डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळतो वा काही विशिष्ट अवयवांवर फोकस किवा झूम करतो. ते पुरेसे नव्हते म्हणून आपल्याकडे ‘आयटम सॉंग’ नावाचा एक विलक्षण प्रकार चित्रपटात हमखास (गरज म्हणून) घातला जातो. स्त्री कलाकारांचे एका विशिष्ट पद्धतीने चित्रीकरण, प्रामुख्याने एका स्त्रिया अभिनेत्रीभोवती अनेक पुरुष घेराव घालून नाचत असतात, तिची छेड काढतात, तिला स्पर्श करतात आणि ह्याला गाण्याच्या तालावर बसवून खेळीमेळीचे वातावरण तयार केले जाते. कथानकाशी काहीही संबंध नसलेले हे आयटम सॉंग चित्रपटाला अधिक प्रेक्षक मिळवावे ह्या हेतूने वापरले जाते. डॉ इश्मित नागपाल ह्यांनी फेमिनिस्ट इंडियामध्ये लिहिलेल्या एका लेखात आयटम सॉंग हे एका विखारी अश्या सामूहिक बलात्काराच्या सुप्त पुरुषी इच्छेचे पडद्यावर साकारलेले रूप आहे असे लिहिले आहे.

हिंदी सिनेमात गोवन कॅथॉलिक महिलांचे अश्या पुरुषी नजरेने सर्रास चित्रण झालेले आहे. त्यामुळेच गोवन कॅथॉलिक स्त्रियांबद्दल, किंबहुना एकूणच गोव्यातील स्त्रियांबद्दल अनेक गैरसमज भारतभर झालेले आहेत. स्थानिक स्त्रियांना पुरुष टुरिस्टकडून होणार त्रास हा प्रामुख्याने अश्या गैरसमजांचे निष्पत्ती आहे. मारियो मिरांडांच्या व्यंगचित्रात आपल्याला पुरुषी नजरेने चितारलेल्या श्रमिक वर्गातल्या स्त्रियांची उदाहरणे दिसून येतात.

मल्वेंनी मांडलेल्या पुरुषी नजरेचा आणि स्त्री पुरुष समानतेचा काय संबंध? कुठल्याही कलाविष्कारातून समाज आपल्या प्रगतीचा लेखाजोखा मांडत त्याचा संग्रह करत असतो. मल्वेंनी मांडलेला पुरुषी नजरेचा सिद्धांत हा केवळ सिनेमात आढळतो असे नाही पण आजच्या घडीला सिनेमाची व्याप्ती बरीच असल्याने स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यांच्यावर लादण्यात आलेल्या अपेक्षा, त्यांच्या वर्तनाचे समाजाने ठरवून दिलेले नियम ह्या सगळ्या गोष्टी त्यातून राबविल्या जातात. जोपर्यंत हे चालू आहे, तोपर्यंत स्त्री हि एक न्याहाळण्याची, उपभोग घेण्याची वस्तू आहे हाच समाज दृढ केला जाईल. तिला तिच्या सभोवतालच्या पुरुषांच्या आकांक्षा आणि अहंकार जोपासण्यापलीकडे काही ध्येय आहे हे एक वैश्विक सत्य म्हणून स्वीकारले जाणार नाही. जोपर्यंत आपण समाज म्हणून महत्वकांक्षी स्त्रीची कल्पना करण्यास असमर्थ आहोत तोपर्यंत स्त्री पुरुष भेद हा कायम राहून त्यातली तफावत वाढत जाईल. स्त्रीला कायम दुय्यम, उपभोग्य वस्तू म्हणून पाहण्याच्या प्रक्रियेचे अंतिम टोक म्हणजे परवाच हाथरस येथे झालेला दलित मुलीवरील सामूहिक बलात्कार. इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेचे नियमन हे स्त्रीच्या शरीरातून होते हि वस्तुस्थिती आहे. ती वस्तुस्थिती बदलण्यासाठी सबळ स्त्रीची कल्पना करणे हि आपल्यातल्या लेखक, चित्रकार, चित्रपट दिग्दर्शक, नाटककार, आणि एकूणच सर्जनशील समाजाची जबाबदारी आहे. तेव्हाच कुठेतरी आपण स्त्री पुरुष समानतेच्या जवळ पोचू शकतो.

(First published in Konkani translation, Bhangarbhuim, 11 October, 2020)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.