By KAUSTUBH SOMNATH NAIK/कौस्तुभ सोमनाथ नाईक
मानव्यशास्त्रांतून गोव्याविषयी जे काही लिहिले आहे त्यात गोव्याच्या इतिहासाची तसेच समाजजीवनातील क्लिष्टता व विरोधाभास ह्या दोन गोष्टी ठळक आढळून येतात. आणि हि मांडणी काहीश्या सोप्या पद्धतीने समजायची असेल तर ज्या संकल्पनांवर हि मांडणी आधारलेली आहे त्यांचाही थोडाफार परिचय करून देणे गरजेचे आहे. गोव्याविषयी, त्याच्या सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय जीवनाविषयी समजायचं झालं तर कुठलाही एक पुस्तक ठोस सांगता येणार नाही. अनेक मांडणीतून इथले विरोधाभास आणि क्लिष्टता समजून घ्यावी लागते. म्हणूनच ह्या सदराची सुरुवात कुठून करावी हा जरासा अवघड प्रश्न होता. पण त्यातल्या त्यात एक पुस्तक कुठलं असेल तर ते डॉ. रघु त्रिचूर ह्यांचं ‘रीफिगरिंग गोवा’ हे २०१३ साली प्रकाशित झालेलं पुस्तक. अमेरिकेतल्या टेम्पल विद्यापीठात त्यांनी अँथ्रोपॉलॉजी शाखेत पीएचडी मिळवली असून हे पुस्तक त्यांनी लिहिलेल्या पीएचडी प्रबंधातून साकार झालं आहे. ते सद्या सॅक्रमेंटो येथील कॅलिफोर्निया स्टेट विद्यापीठात प्राध्यापक म्हणून रुजू आहेत.
ह्या पुस्तकात गोव्याच्या अर्थव्यवस्थेला समोर ठेवून एकेकाळी व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्याचं स्वातंत्र्योत्तर काळात पर्यटन स्थळात कसं रूपांतर झालं ह्याविषयी ते काही मूलभूत निरीक्षणं मार्क्सवादी चौकटीतून मांडतात. मार्क्सने आपल्या लेखनात ऐतिहासिक भौतिकतावादाची (हिस्टोरिकल मटेरियलिजम) मांडणी केली आहे. त्याच्या द्वंदात्मक भौतिकतावादाच्या (डायलेक्टिकल मटेरियलिजम) सिद्धांताला पूरक अशी हि संकल्पना आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर कुठल्याही समाजातील इतिहासाच्या किंवा राजकारणातल्या उलथापालथीचे स्पष्टीकरण त्या समाजातील अर्थव्यवस्था कशी आणि कुठल्या संबंधावर आधारित आहे त्यात सापडू शकते असे मार्क्स म्हणतो. ह्यातले द्वंद्व हे प्रामुख्याने भांडवलशाही आणि श्रमिक ह्या दोन वर्गात असते. बऱ्याच अंशी हि मांडणी अर्थव्यवस्थेत जमिनीच्या मालकी कोणाकडे आहेत, त्यावर कर/महसूल कसा आणि कोण मिळवतो, तो मिळवण्यासाठी, जमीन कसण्यासाठी कुठला वर्ग आपले श्रम खर्ची घालतो इत्यादी बाबींकडे लक्ष दिले जाते. श्रमिक वर्गाच्या शोषणावर भांडवलशाही वर्ग आपली श्रीमंती निर्माण करतो आणि ह्या जाणिवेतूननच ऐतिहासिक बदल आणि स्थित्यंतरं येतात असा त्याचा सारांश आहे. इतिहास समजण्याची हि एक मार्क्सवादी चौकट आहे. खुद्द गोव्याचे सुपुत्र दामोदर धर्मानंद कोसंबी हे ह्या चौकटीतले एक आद्य भारतीय इतिहासकार मानले जातात.
गोव्याच्या इतिहासाचे लेखन आणि त्याचे विश्लेषण हे ‘गोवा दुरादा’ आणि ‘गोवा इंडिका’ ह्या दोन ढोबळ पद्धतीत विभागले आहे. ‘गोवा दुरादा’ म्हणजे पोर्तुगीज भाषेत सोनेरी गोवा. ह्यांतर्गत गोव्याची जीवनपद्धती आणि संस्कृती हि युरोपियन आणि कॅथॉलिक मूल्यांवर आधारलेली आहे हे मांडणारे मतप्रवाह मोडतात. एकोणिसाव्या शतकातील पोर्तुगीज साम्राज्याच्या ढासळत्या प्रतिमेमुळे स्थानिकांनी बंड करून पोर्तुगीज सत्तेला आव्हान करू नये म्हणून एकेकाळी पूर्वेकडील रोम म्हणून ओळखले जाणाऱ्या सोनेरी गोव्याची प्रतिमा लोकप्रिय करण्यात आली होती. जेणेकरून स्थानिक उच्चभ्रू लोकांनी ते सोनेरी दिवस परतण्याची इच्छा बाळगून तसेच पोर्तुगीज साम्राज्यातच आपले हितसंबंध सुरक्षित राहतील हे आश्वस्त करण्यासाठी गोवा दुरादाचा वापर वेळोवेळी करण्यात येत असे.
ह्या मतप्रवाहाला प्रतिक्रिया म्हणून ‘गोवा इंडिका’ हा मतप्रवाहही लोकप्रिय झाला. गोवा इंडिका अंतर्गत गोवा हा भारतीय उपखंडाच्या कसा अविभाज्य भाग आहे, येथील लोक आणि संस्कृती हि युरोपीयन आणि कॅथॉलिक नसून ती भारतीय आणि हिंदू आहे हे मांडण्याचा प्रयत्न चालू होते.
त्रिचूरांच्या मते हे ऐतिहासिक अध्ययनाचे दोनही प्रवाह गोव्याच्या समाजजीवनाविषयी एक मर्यादित चित्र उभे करतात. गोवा दुरादात गोव्याच्या आणि पर्यायाने गोवेकरांच्या इतिहासाला बाजूला करण्यात आले तर गोवा इंडिकामध्ये पोर्तुगीज वसाहतवादाचे गोमंतकीय समाजावरचे झालेले परिणामांबद्दलचे विश्लेषण नाही व किंबहुना त्याची हेटाळणीच जास्त केली गेली आहे. ह्या मतप्रवाहांच्या मर्यादा लक्षात घेऊन त्रिचूर म्हणतात कि गोव्याच्या समाजाचं विश्लेषण हे भाटकार-मुंडकार संबंधावर करणं गरजेचं आहे. पोर्तुगीज विरुद्ध गोमंतकीय हे चित्र मर्यादित आहे कारण त्यात ‘गोमंतकीय’ समाज हा एकजिनसी समाज म्हणून रंगविला गेला आहे. जातवार आधारित समाजात स्थानिक भाटकारांकडे जमिनी होत्या तर मुंडकारांचे शोषण भाटकार आणि वसाहतवादी वर्गाने दोघांनी संयुक्तरित्या केले असताना फक्त पोर्तुगीजांवरच त्याचे खापर फोडून भाटकारवर्गाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही अशी मांडणी त्रिचूर करतात.
स्वातंत्र्योत्तर गोव्याचे राजकारणदेखील ह्याच भाटकार-मुंडकार धर्तीवर समजण्याचा प्रयत्न त्रिचूर करतात. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाची सत्तेपर्यंतची झेप जरी हिंदू बहुजन समाजाच्या पाठबळावर झाली असली तरी त्रिचूरांच्या ह्या गोष्टीला मुंडकार वर्गाच्या हितातून निर्माण झालेली परिस्थिती असे दर्शवतात. ह्या अनुषंगाने किंवा विलीनीकरणाने वा घटक राज्य मिळाल्याने जमिनीच्या मालकीवर कसा परिणाम झाला असता किंवा झाला हे विश्लेषण करणे महत्वाचे ठरेल. वरवर गोव्याच्या सांस्कृतिक अस्मितेचे लढे वाटणाऱ्या ह्या चळवळींमागे नक्की भाटकार-मुंडकार वर्गाचे हितसंबंध कसे एकमेकांविरुद्ध ठाकले होते आणि ह्या चळवळींच्या निकालाचा फायदा नेमका कोणत्या वर्गाला झाला हे समजण्यासाठी त्रिचूरांचे पुस्तक महत्वाचे आहे.
गोव्याचा पर्यटनस्थळ म्हणून विकास होण्याच्या प्रक्रियेबद्दल त्रिचूर म्हणतात कि गोवा पोर्तुगीज अमलाखाली असल्याने इथली प्रशासन आणि कामकाजाची पद्धती वेगळी होती आणि ह्या वेगळ्या व्यवस्थेला सरावलेला सत्ताधारी वर्ग त्याची स्थानिक अर्थ/समाजव्यवस्थेत असलेली मक्तेदारी अबाधित राखण्याचे प्रयत्न करत होता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेतील उदयाने बहुजन समाजही सत्तेत थेट सामील होत होता. ह्या सर्व कारणांमुळे गोवा हा एक वेगळेच समाजभान असलेला प्रदेश आहे असे चित्र राष्ट्रीय पातळीवर उभे राहिले. ह्या एकूणच संभ्रमावर आणि सत्तांतराच्या अडचणींवर मात करण्यासाठी पर्यटन हा एक नामी उपाय ठरला. गोव्याला प्रशासकीय आणि सांस्कृतिकदृष्ट्या भारतात सामावून घ्यायचे असेल तर ते गोव्याचे वेगळेपण अधोरेखित करूनच घ्यावे लागेल हे केंद्र सरकारला कळून चुकले. हेच सांस्कृतिक वेगळेपण गोव्याच्या पर्यटन धोरणाचा पाया बनले. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे गोवा हे पोर्तुगीज संस्कृतीने नटलेला प्रदेश आहे हा समज जसा पोर्तुगीज राज्यकर्त्यांनी रूढ केला तसाच तो मुक्तीनंतरच्या काळात भारतीय सरकारनेसुद्धा केला. ह्यातून गोवा भारतीय प्रशासनात आणायला मदत झालीच पण गोव्यातील आणि भारतातील वसाहतवादाच्या इतिहासातील वेगळेपणाला बगल देण्यात यश आले.
गोव्याच्या इतिहासा व समाजाचे वर्णन बऱ्याच समाजशास्त्रज्ञांनी आणि इतिहासकारांनी केले आहे पण गोव्यातले समाजजीवन जमीनीचे मालकी हक्क तसेच त्यातून निर्माण होणाऱ्या भाटकार-मुंडकार संबंधांशी निगडित आहे अशी मांडणी करून त्याचे नीट मार्क्सवादी पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न केल्याने त्रिचूर ह्यांचे पुस्तक गोव्यावर लिहिल्या गेलेल्या इतर पुस्तकांपेक्षा नक्कीच उजवे (कि डावे?) ठरते.
(First published in Gomantak, dt: 22 January, 2022)